आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला गडचिरोली जिल्हा... पण २०१४ नंतर भाजपाच्या बाजूनं झुकला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं गडचिरोली नेमकी कुणाची हवा आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली काही वर्षे मागास आणि नक्षल हिंसेने ग्रस्त हा जिल्हा विविध कारणांनी राज्यातील जनतेच्या चर्चेत असतो. राजकीयदृष्ट्या २०१४ नंतर भाजपला अनुकूल झालेला हा जिल्हा ताज्या लोकसभा निकालात देखील मोदींच्या बाजूने झुकला आहे. लोकसभा-विधानसभा-जिल्हा परिषदा -नगर परिषदा आणि नगरपंचायतींत भाजपला कौल मिळाल्यावर पुन्हा एकदा जिल्हा विधानसभा निवडणुकांना सामोरा जाणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून मागास आणि नक्षली हिंसेनं ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा... एकेकाळचा काँग्रेसचा गड होता. पण २०१४ च्या मोदी लाटेत जिल्ह्याचं चित्र बदललं. अहेरी, गडचिरोली आणि आरमोरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपाचं कमळ फुललं. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कधी नव्हे ते भाजपनं स्वबळावर बहुमत प्राप्त केलं. तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा मैदानात भाजपाचे अशोक नेते यांनी काँग्रेस उमेदवाराला धूळ चारली. याच विजयाची पुनरावृत्ती विधानसभेला होईल, असा विश्वास भाजपाला आहे.


दुसरीकडे भाजपा केवळ आश्वासनांचे फुगे हवेत उडवत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. नक्षल्यांना लगाम घालण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीतून डॉ. देवराव होळी आणि आरमोरीतून कृष्णा गजबे या विद्यमान भाजपा आमदारांना पुन्हा तिकीट मिळेल. मात्र अहेरीमध्ये अंबरीश आत्राम यांच्याऐवजी वेगळ्या पर्यायाचा विचार भाजपानं सुरू केला आहे. चार वर्षं मंत्रीपद देऊनही त्यांची कामगिरी सुमारच राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना भाजपाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम भाजप-राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांना अडचणीत आणू शकतील का? हाही कळीचा मुद्दा आहे. 


सध्याचं राजकीय चित्र पाहता गडचिरोलीत भाजपाची सरशी राहील, असं दिसतंय. आता भाजपा खरोखरच लोकसभा निवडणुकीतला प्रभाव कायम राखणार की, काँग्रेस-राष्ट्रवादीला काही संधी मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.