Maharashtra Politics : ऐन दिवाळीत महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटण्याची चिन्हं आहेत. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडी. दुपारी अजित पवारांनी पुण्यात काका शरद पवारांची भेट घेतली. काका-पुतण्याच्या या भेटीमुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीत नेमकं काय घडलं, त्यावरुन चर्चांना उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीत  राजकीय उलथापालथींना वेग


राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. अजित पवारांच्या भेटीआधी शुक्रवारी सकाळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. दिलीप वळसे पाटील हे एकेकाळचे पवारांचे कट्टर निकटवर्तीय समजले जातात. शरद पवारांना पुन्हा एनडीएत सामील करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का, अशी कुजबूज कानावर पडतेय. पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यानं अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. मराठा आरक्षणात त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, याबद्दल भाजपच्या गोटात नाराजी असल्याचं समजतंय. अजितदादांचा आजार हा राजकीय आजार असल्याची टीका विरोधकांनीही केली.


डेंग्यूच्या आजारातून बरे होत असलेले अजित पवार पुन्हा कामाला लागल्याचं चित्र शुक्रवारी दिसलं. शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी थेट दिल्ली गाठली. आता तरी त्यांची नाराजी दूर होणार का, या प्रश्नाचं उत्तर अमित शाहांच्या भेटीतून मिळणाराय
शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांसह सर्व पवार कुटुंब उपस्थित होतं. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. 


पवार काका-पुतण्या एक होणार?


दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होण्याची शक्यता आहे... पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं नव्या चर्चांना उधाण आलंय... गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा आजार झाल्यानं अजित पवार घरीच होते. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं आणि सत्तेत निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्यानं ते नाराज असल्याची चर्चाही होती. डेंग्यूमुळं कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नसल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं. मात्र पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात... सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.