मुंबई : वेदान्ता प्रकल्पसंदर्भात (Vedanta project) मोठी बातमी माहिती समोर आली आहे. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे फडवणीस सरकारमध्ये वेदान्ता प्रकल्प (Vedanta project) महाराष्ट्रातून गेल्यामुळे वाद सुरु असताना दुसरीकडे माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन आघाडी सरकारकडून दिरंगाई झाल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून माहिती अधिकारात देण्यात आलीय. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) गेला असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून काही जुन्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला फॉक्सकॉन प्रकल्प (foxconn project) आणि वेदान्त फॉक्सकॉन (vedanta foxconn) प्रकल्प पूर्णपणे वेगळे असल्याची माहिती आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी दिली होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र माहितीच्या अधिकारातून एमआयडीसीने (MIDC) धक्कादायक माहिती दिली आहे. 5 जानेवारी रोजी वेदान्ता कंपनीने स्वारस्य अभिव्यक्ती दाखवली होती. त्यानंतर वेदान्ताने 14 मे रोजी गुंतवणूकीबाबत अर्ज दिला होता. परंतु तत्कालिन सरकारने याकडे दुर्लक्ष केले. साडेचार महिने त्याबाबत निर्णय न आल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. असा खुलासा एमआयडीसीने माहिती अधिकारातून केला आहे. संतोष गावडे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली होती.


एमआयडीसीने नेमकं काय म्हटलं?


* वेदान्ताने पहिल्यांदा 5 जानेवारीला प्रकल्पाबाबात स्वारस्य दाखवले होते. त्यानंतर 5 मे रोजी पुन्हा कंपनीने स्वारस्य दाखवले. त्यानंतर कंपनीने 14 मे रोजी कंपनीने एमआयडीसीकडे गुंतवणुकीबाबत अर्ज दाखल केला.


* तत्कालीन आघाडी सरकारने जवळपास साडेचार महिने कंपनीच्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही.
 
* सत्तातरानंतर 15 जुलैला  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली.


* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 आणि 15 जुलैला कंपनीला पत्र लिहून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती केली.


* 26  जुलै रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेदान्ता फॉक्सकॉन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्याचदिवशी एकनाथ शिंदे यांनी वेदान्ता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना पत्र लिहून सामंजस्य करार करण्यास सांगितले. 27 आणि 28 जुलैला कंपनीच्या प्रतिनिधींनी तळेगावला भेट देऊन प्रस्तावित जमीन आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली.


* त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी अग्रवाल यांची मुंबईत भेट घेत सरकारचा पूर्ण या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.


* 5 सप्टेंबरला एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांना पत्र लिहून सामंजस्य करार करण्यासाठी निमंत्रित केले होते, असे एमआयडीसीने म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले होते. फडणवीस यांनी अनेक वृत्तपत्रातील बातम्या दाखवत खुलासा केला होता. 'वेदान्त-फॉक्सकॉन' प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 7 जानेवारी 2020 रोजीच सांगितले होते. 'टाटा- एअरबस' प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे 2021 मध्येच ठरले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता असूनही टाटा कंपनीतील उच्चपदस्थांना निवासस्थानी बोलावून चर्चा केली. तेव्हा राज्यातील वातावरण गुंतवणुकीसाठी चांगले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तरीही मी एमआयडीसीच्या उच्चपदस्थांना सांगून हा प्रकल्प राज्यात व्हावा, असा पाठपुरावा केला. आमचे सरकार असताना या प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. विदर्भात प्रकल्प होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.


आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर


देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेत फडणवीसांनी फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला फॉक्सकॉन प्रकल्प आणि वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प पूर्णपणे वेगळे असल्याचे सांगितले. "पत्रकार परिषदेत एवढं खोटं बोलल्याचं मी कधीही ऐकलं नव्हतं किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्प 2016 साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 'मॅग्नेटीक महाराष्ट्र' योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती," असे आदित्य ठाकरे म्हणाले.


"पुढे हा प्रकल्प अमेरिकेत गेला आणि आता त्याठिकाणी उत्पादन सुरू आहे. हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदान्ता फॉक्सकॉनचा प्रकल्प 'सेमीकंडक्टर चिप' साठी होता. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेला प्रकल्प 'मोबाईल' फोनसाठी होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती असेल की, कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं सोडून द्या. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या," असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


दरम्यान, आता एमआयडीसीने ज्या प्रकल्पाबाबत खुलासा केला आहे तो आदित्य ठाकरेंनी उल्लेख केलेल्या प्रकल्पापेक्षा वेगळा आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्जदार संतोष गावडे यांनी वेदान्ताने प्रकल्पासंदर्भात माहिती मागवली होती. एमआयडीसीने गावडे यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत सविस्तर माहिती देखील दिली.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प रोखण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते असेच एमआयडीसीच्या उत्तरातून स्पष्ट होत आहे.