मुंबई : लोकसभेत संख्याबळ सिद्ध झालं नाही तेव्हा इतक्या डिग्निटीनं वाजपेयींनी सत्ता सोडली. ही डिग्निटी फडणवीस सरकारला का दाखवता आली नाही. पार्टी विथ डिफरन्सचं बिरुद मिळवणारे कमळवाले इतक्या चिखलात कसे उतरले, हा सच्च्या भाजपनिष्ठ कार्यकर्त्याला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. वाजपेयी आणि अडवाणींचा काळ बदलला असेलही. पण म्हणून भाजपनं इतकं गढूळ राजकारण करावं? गेली पाच वर्षं देवेंद्र फडणवीसांनी मिस्टर क्लीनची इमेज कसोशीनं जपली. पण त्या इमेजचा तीन दिवसांच्या तमाशात पुरता धुव्वा उडाला.


हे करुन भाजपनं काय साधलं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. भाजपची सत्ता गेली
२. नैतिकतेच्या पातळीवर भाजप जनतेच्या मनातून घसरली.
३. स्वच्छ प्रतिमेचा पार चोळामोळा झाला.
४. घोडेबाजार करणार नाही म्हणणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं.
५. सिंचन घोटाळ्यात आरोपी म्हणून ज्यांची भाजपनंच संभावना केली, त्यांच्याच साथीनं सत्ता स्थापल्यावर आता शिवसेनेवर टीका कुठल्या तोंडानं करणार?
६. या सगळ्यामुळे जनतेमध्ये भाजपबद्दल काय संदेश गेला?
७. भाजपशी प्रामाणिक मतदार या घिसाडघाईमुळे दुखावला नाही का?


अजित पवारांबरोबर सरकार स्थापन न करता संयम आणि धीर दाखवला असता तर किमान बहुमतात असूनही सत्तास्थापन करु न शकलेला पक्ष म्हणून किमान सहानुभूती तरी मिळाली असती. भाजपच्या पराभवाचं खापर अर्थातच देवेंद्र फडणवीसांवर फोडलं जाईल. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेशिवाय हे घडणं शक्य नाही. सत्तास्थापनेच्या घाईमुळे तेल गेलं तूप गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी भाजपची अवस्था झाली. भाजपच्या चाणक्यांनी आणि धुरीणांनी यांचा विचार करायलाच हवा.