मुंबई : Serious allegations by Suhas Kande : आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. हिंदुत्वाच्या विचार करुन आम्ही उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीत. आम्ही उठाव केला आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. काही नक्षली मारले गेले. त्यानंतर शिंदे यांचा नक्षलवाद्यांकडून खून करण्याचा प्रयत्न होता. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी झाली. मात्र, वर्षा बंगल्यावरुन (थेट उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता) आदेश गेला की त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येऊ नये. म्हणजे शिंदे यांचा खून करण्याचा हा प्रयत्न होता, असा थेट आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना काही नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर त्यांना  झेड प्लस सुरक्षा देण्याचे मान्य झाले. मात्र, शिंदे यांना  झेड प्लस सुरक्षा  देऊ नका, असा आदेश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना सकाळी 8.30 वाजता वर्षावरुन आला. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिंदे हे शिवसेनेचे काम करत आहेत. दिघेसाहेबांचे विचार. हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेब यांचे विचार पुढे नेले. शिवसेना मोठी केली. शिवसेना मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुम्ही मदत करणार होता का? याचा अर्थ तुम्ही हिंदुविरोधी कृती केली, असा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला.


दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोड घडवून आणले. शेकडो माणसं मारली गेलीत. बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या लोकांशी यांचे संबंध असणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचे काय, असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला.


दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी सुहास कांदे हे त्यांना निवदेन देणार आहे, असे कांदे यांनी स्पष्ट केले.


मनमाड नांदगावचे आमदार सुहास कांदे शिंदे गटात सामील झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करुन त्याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावं यासाठी मनमाडमध्ये दाखल झाले आहेत. रस्त्यात येताना आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीला सुहास कांदे यांनी हात दिला, मात्र पिंपळगाव टोलवर सज्ज असलेल्या शिवसैनिकांनी सुहास कांदे यांच्या विरोधात निषेदाच्या घोषणा दिल्या.