सिंधुदुर्ग : आज गणेशाच्या मूर्तीसह सिंधुदुर्गाच्या 'चिपी' विमानतळावर पहिलं वहिलं विमान दाखल होणार आहे. मुंबई विमानतळावरून गणरायाची मूर्ती घेऊन एक 12 आसनी चार्टर्ड फ्लाईट 'चिपी' विमानतळावर उतरणार आहे. या हवाई चाचणीचं यश प्रत्यक्षरित्या अनुभवण्यासाठी गृहराज्यमंत्री-जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक स्थानिक नेते विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. पण, भल्याथोरांच्या नावाचा आग्रह न धरता या विमानतळाला 'चिपी' असं का म्हणतात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? 


अधिक वाचा : गणेशमूर्तीसह सिंधुदुर्गच्या 'चिपी' विमानतळावर पहिलं विमान दाखल


नावातच सर्व काही आहे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात, मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या नावाबद्दल इतका वाद आणि आग्रह झाल्यानंतर हा प्रश्न अनेकांना पडणं साहजिकच आहे. पण, या विमानतळाचा उल्लेख चिपी विमानतळ केला जातोय त्याचं कारण म्हणजे, हे विमानतळ उभं राहिलंय परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये... परुळे गावचाच एक भाग असलेलं चिपी हे पूर्वी एक पठार होतं... 


हे विमानतळ उभं राहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत... त्यामुळे या विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिलं जावं, अशी स्थानिक नेत्यांची आणि नागरिकांची मागणी आहे. या विमानतळापासून कुडाळ २४ किमी, तर मालवण १२ किमी अंतरावर आहे. 'कोकणची विकासाकडे वाटचाल' म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातंय आणि त्याचीच सुरुवात 'चिपी' या छोट्याशा गावातून झालीय. 


पाट- परुळे - चिपी रस्ता साडे पाच मीटर रुंद करणे, बीएसएनएल थ्रीजी टॉवर सुरू करणे, कुंभारमाठ ते चिपी वीजवाहिनी टाकणे, पाट व केळूस गावातील तलावातून पाणी चिपीला पुरवठा करणे यांसहीत विमानतळाच्या इतर कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी गेल्याच महिन्यात इथं भेट दिली होती. 


आंतरराष्ट्रीय विमानंही उतरणार


तब्बल ५२० कोटी रुपयांचा हा प्रकल्प एमआयडीसीनं आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिला आहे. या विमानतळाची धावपट्टी २५०० मीटरची असून भविष्यात तिचा विस्तार करण्यास वाव असेल. 'चिपी' विमानतळाची गर्दीच्या वेळेस २०० प्रवाशांचे आगमन आणि दोनशे प्रवाशांचे प्रस्थान हाताळण्याची क्षमता आहे. अतिरिक्त बांधकाम न करता ही क्षमता प्रत्येकी ४०० प्रवाशांपर्यंत विस्तारण्याची व्यवस्था करता येऊ शकते, असं सांगण्यात येतंय.हे विमानतळ देशांतर्गत प्रवाशांसाठी असले तरी त्यावर आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने उतरू शकतील. डिसेंबर महिन्यात माल्टा इथून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान या विमान तळावर उतरेल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी केली होती.