का होत आहेत पुन्हा पुन्हा नवनीत राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल? हा आहे आताचा नवीन गुन्हा
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबई : तब्बल ३६ दिवसानंतर राणा दाम्पत्य यांचे नागपुरात गमन झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करून अमरावतीला गेले. अमरावती येथे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यामुळे भीम आर्मी आक्रमक होऊन राणा समर्थक आणि भीम आर्मी समोरासमोर आली होती. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्य यांच्याविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर 341,135, 291,143 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस पाठविली आहे. यानंतर त्यांची जामिनासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राणा यांचे वकील ॲड. दीप मिश्रा यांनी हे सर्व गुन्हे जामीनपात्र असल्याचे सांगितले आहे.
तर, दुसरीकडे राणा दाम्पत्यांच्या खार येथील 'लाव्ही' या इमारतीमधील घरी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी पोहोचले. पालिकेकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका पालिकेकडून ठेवण्यात आला आहे. पालिकेचे दोन अधिकारी इमारतीमध्ये पाहणीसाठी आले असून या इमारतीमधील आठ रहिवाशांना पालिकेकडून नोटिस बजावण्यात आली आहे.