Ladaki Bahin Yojana first installment :  राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पहायला मिळतंय. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय. अशातच आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 1 रुपया मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली.


लाडकी बहीण योजनेत फक्त 1 रुपया मिळणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. 


लाडक्या बहिणींना हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असं आवाहन देखील आदिती तटकरेंनी केलं आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती देखील आदिती तटकरेंनी दिली. तर अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नाही, अशी ग्वाही देखील तटकरेंनी दिली आहे.


दरम्यान, जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.