मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून त्याचं अध्यक्षपद आदित्य शिरोडकर यांच्याकडं होतं. पण, आदित्य यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यापासून रिक्त असलेल्या या पदावर 'राज'पुत्र अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट करून मनसेची स्थापना केली. त्यांचे वत्कृत्व आणि आक्रमक बाणा याकडे अनेक तरुण, विद्यार्थी आकर्षित झाले. या तरुणांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद आदित्य शिरोडकर यांच्याकडे दिलं होतं.


आदित्य शिरोडकर यांनी मनविसेमध्ये अधिकाधिक तरुणांना जोडण्याचं काम केलं. मात्र, आदित्य शिरोडकर यांनी २० जुलै २०२१ ला मनविसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेची विद्यार्थी सेना नेतृत्वहीन झाली होती.


गेल्या काही वर्षांपासून अमित ठाकरे हे मनसेत सक्रिय झाले. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न तसेच कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधलं. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड कुतुहल आहे.


आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मनविसेचे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्याची मागणी मनसैनिकांकडून होत होती. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महापालिका निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविली होती. त्यांनी या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकावून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे अमित ठाकरे यांच्याकडेही आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे.  


या पार्श्वभूमीवर अमित राज ठाकरे यांना आज हजारो मनसैनिकांनी, नेत्यांनी, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ इथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत आलेली मरगळ दूर होऊन आता मनविसेला नवी शक्ती मिळेल असा विश्वास अनेक मनसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.