भंडारा प्रकरण : दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यातील रूग्णालयाची पहाणी केली.
भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यातील रूग्णालयाची पहाणी केली. त्याचप्रमाणे पीडित पालकांना भेटून त्यांचं सांत्वन देखील केलं. पालकांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणालाही आरोपी करणार नाही, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असं सांगितलं. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. कोरोना संकट असल्यामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे का? हा प्रकार अचानक घडला आहे की याआधी वारंवार तक्रारी येत असताना अनास्थेमुळे ही दुर्दैवी घटना घडली. याची देखील सखोल चौकशी करण्यार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी विभागीय आयुक्त आणि मुंबईचे फायर ऑफिसर यांना देण्यात आली आहे. दुर्घटना घडली त्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाही. कोरोना संदर्भात काम करताना आरोग्य यंत्रानेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का हे अहवालात समोर येईल.
चौकशीसाठी नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात समिती बनविली आहे, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी त्यात असतील. राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एण्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.