`प्लास्टीकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू होणार`
प्लास्टीक विरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : निवडणुकीच्या काळात प्लास्टीक विरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात प्लास्टीक बंदीबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारने प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाईच्या भीतने प्लास्टीकचा वापर बंद झाला होता. मात्र आता पुन्हा प्लास्टीक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याचे सांगत सरकार ठोस प्लास्टीकबंदीसाठी काय भूमिका घेणार ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारला होता.
मुंबई महापालिकेने प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात तपासण्या सुरू करून कारवाई केली होती. मात्र आचारसंहितेमुळे कारवाईचे काम थाबंले होते. आता पुन्हा ही कारवाई सुरू झाली आहे. ठाणे मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, दादर फुल आणि भाजी मार्केट इथे पुन्हा कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात या कारवाईचे परिणाम दिसू लागतील, अशी माहिती कदम यांनी विधानसभेत अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
प्लास्टीकबंदीमुळे राज्यातील प्लास्टीक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले. त्यामुळे बेरोजगार झालेल्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का ? असा प्रश्न भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहित यांनी विचारला होता. त्याला रामदास कदम यांनी उत्तर दिले. प्लास्टीकचा राक्षस गाडण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलाय. आशिया खंड जेवढा आहे, तेवढा प्लास्टीकचा कचरा समुद्रात साठलेला आहे. प्लास्टीकचे दुष्परिणाम मोठे आहेत. त्यामुळे प्लास्टीकचे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे. यापुढे प्लास्टीक कारखाने सुरू होऊ देणार नाही, असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपल्या राज्यात 80 टक्के प्लास्टीक गुजरातमधून येत होते. त्यामुळे तिथले लोक बेरोजगार झाले आहेत. गुजरातमध्येही प्लास्टीक बंदी लागू करावी यासाठी मी पंतप्रधानांना पत्र लिहल्याची माहितीही कदम यांनी यावेळी बोलताना दिली.