विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : व्हॉट्सअॅपवर अनेक गोष्टी अगदी सहज फॉर्वर्ड होत असतात. बऱ्याचदा त्याची शहानिशा होत नाही. असाच एक मेसेज सध्या वेगानं व्हायरल होत आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एस महामंडळाकडून मोफत पास मिळणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. 

 

या मेसेजमध्ये एसटी महामंडळात जाऊन ज्येष्ठ नागरिकांनी एक कार्ड घ्यावं लागेल असंही म्हंटलं आहे. तुमच्या पर्यंत हा मेसेज जर आला असेल तर ही बातमी नक्की वाचा आणि आला नसेल तरीही या मेसेजपासून सावध राहा. याचं कारण म्हणजे झी 24 तासनं या व्हायरल मेसेजमागचं सत्य शोधून काढलं आहे. 


ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी पास मिळणार असल्याच्या एका मेसेजनं सध्या धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअपवर हा मेसेज वा-यासारखा पसरत आहे. त्यात ज्येष्ठांना एसटीचे मोफत पास दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमका हा मेसेज काय आहे आणि त्याचं सत्य काय आहे जाणून घेऊया. 

 

काय आहे व्हायरल मेसेज?

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 4000 किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे. आपले आधार कार्ड,  मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप देऊन आणि 55 रुपये भरून जवळच्या एसटी डेपोत हे कार्ड मिळेल. 

 

अशा आशयाचा हा मेसेज आहे. हा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर आल्यानं ज्येष्ठ नागरिकांकडून मोफत पाससाठी विचारणा होऊ लागली आहे. खरंच असे मोफत पास मिळतायेत का? सरकारनं यासाठी कोणती नवी योजना आणलीय का? हे जाणून घेण्यासाठी आमच्या झी 24 तासच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या प्रतिनिधींनी औरंगाबादच्या विभाग नियंत्रकांचं कार्यालय गाठलं. तिथल्या अधिका-यांना हा मेसेज दाखवला आणि मग त्यांनी जे सांगितलं ते धक्कादायक आहे. 

 

काय आहे नेमकं सत्य?

हा मेसेज पाहिल्यावर अनेकांनी एसटी डेपोत गर्दी सुद्धा केली होती. मात्र मोफत पासची कोणतीही योजना नसून केवळ ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं. ज्येष्ठांसाठी मोफत पास देण्याची कोणतीही योजना एसटी महामंडळाने सुरू केलेली नाही. ज्येष्ठांसाठी केवळ स्मार्ट कार्डची योजना सुरू आहे. त्याचा आणि मोफत पास योजनाचा कोणताही संबंध नाही. 

 

खोडसाळपणा करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक हा मेसेज व्हायरल केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे तुम्ही अफवांवर विश्वास ठेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून मोफत पास मिळत असल्याचा मेसेज आमच्या पडताळणीत असत्य ठरलं आहे.