मुंबई : रेल्वे कामगारांचा घरांचा प्रश्न सोडविण्याबरोबर त्यांना बोनस मिळवून देणार असे आश्वासन देताना कोकण रेल्वेला 'झोन'चा दर्जा मिळवून देण्याची घोषणा रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे कामगार शिवसेनाचा मेळावा गोव्यातील मडगाव येथे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी हे त्यांनी आश्वासन दिले. अडसूळ यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ गोव्यातील मडगाव येथून केला.


मान्यता प्राप्त युनियनसाठी निवडणूक


येत्या २४ जानेवारीला कोकण रेल्वेत मान्यता प्राप्त युनियनसाठी निवडणूक होत आहे. चार संघटना सहभागी असलेल्या या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार आनंदराव अडसूळ यांनी कोकण रेल्वेला झोनचा दर्जा मिळवून देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कामगारांप्रमाणेच कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 


घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार


कोकण रेल्वेत होणाऱ्या मान्यता प्राप्त युनियनसाठीच्या निवडणुकीत प्रथमच उतरणाऱ्या रेल कामगार सेनेने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्ज व्याजावर २ टक्के सबसिडी देण्यात येईल, अशी घोषणा अडसूळ यांनी केली. तसेच त्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे सांगितले.



पदाधिकाऱ्यांचा रेल्वे कामगार सेनेत प्रवेश


या मेळाव्याच्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी रेल कामगार सेनेने प्रवेश केला. एन आर एम यू चे मडगांव अध्यक्ष प्रमोद हरमळकर यांच्यासह त्यांच्या अनेक सहकारी कर्मचाऱ्यांनी कामगार सेनेत प्रवेश केला.


या मेळाव्याला रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव,  सरचिटणीस नरेंद्र शिंदे,  कोकण रेल्वे युनिट अध्यक्ष नंदकिशोर सावंत,  सरचिटणीस राजू सुरती, संपर्क प्रमुख विलास खेडेकर,  सेकेटरी रवींद्रनाथ  आदी पदाधिकारी उपस्थित होते.