उदयनराजे भाजपकडून राज्यसभेवर जाणार का?
भाजपकडून तीन जण राज्यसभेवर जाणार
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे राज्यसभेवर जाणार का? याचीही चर्चा सुरू झाली आहे. काय आहे कारण...उदयनराजेंचं पुनर्वसन होणार का? उदयनराजे भाजपकडून राज्यसभेवर जाणार का? असे सवाल विचारण्यात येत आहेत.
उदयनराजे अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे. कारण त्यांचा अंदाज चुकला आहे. विधानसभा निवडणुकीत पाटण, सातारा, वाई, कराड दक्षिण, कोरेगावमधले आपल्याला मानणारे सगळे आमदार निवडून येतिल आणि जिल्ह्याचं राजकारण आपल्या हाती येईल अशी अपेक्षा उदयनराजेंना होती. तसंच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्याविरोधात तुल्यबळ उमेदवार मिळणार नाही, असंही राजेंना वाटलं होतं.
सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मानणारा असल्याने मी पुन्हा येईन, हा विश्वास उदयनराजेंना होता. पण सातारा जिल्ह्यातलं शरद पवारांचं वलय, राष्ट्रवादीची ताकद , सहकार चळवळ आणि त्या दिवशीची पवारांची पावसातली सभा.... यामुळे श्रीनिवास पाटील यांच्याकडून उदयनराजेंचा पराभव झाला. लोकसभा पोट निवडणुकीत काही दगाफटका झाला तर राज्यसभेवर घेतलं जाईल असा शब्द भाजपनं दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजेंचे कार्यकर्ते पुन्हा प्रचंड आशावादी झालेत.
भाजपाला जर राज्यातली ताकद वाढवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांना राज्यसभेवर घेणं भाजपला फायद्याचं ठरेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भाजपकडून तीन जण राज्यसभेवर जाणार आहेत. त्यात आठवलेंना भाजपनं शब्द दिल्यानं त्यांचं पक्क ठरलंय. दुसरं नाव फडणवीसांचं चर्चेत आहे. आता तिसरं नाव उदयनराजेंचं ठरतं का? थोड्या काळातच कळेल.