राज्यात काही ठिकाणी आणखी दोन दिवस पावसाचे संकट
हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस (Rain) बरसत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.
मुंबई : हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस (Rain) बरसत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काल विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Rains with possibility of hailstorms at isolated places in interior of Maharashtra)
पुणे, महाबळेश्वर, औरंगाबाद, अकोल्यात जोरदार सरी बरसल्या. अरबी समुद्रातून सध्या उत्तर-पश्चिम भारतात बाष्पाचा पुरवठा होत असल्यानं या भागात पाऊस होतोय. राज्यातही हवेची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याच स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दरम्यान गारपीटही झाली. कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे सावट राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 मार्चला असे हवामान असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. तसेच हलका स्वरुपाचा पाऊस पडरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात सकाळपासून विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाला सुरवात झालीय. सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यात आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली असून शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय.
बीड जिल्ह्यामध्ये कालपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोर धरला. जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये रात्री पाऊस झाला. बीड,आष्टी,वडवणी आणि धारूर तालुक्यामध्ये सकाळी पाऊस सुरू होता. काही भागांमध्ये विजेच्या गडगडाटांसह पाऊस झाला. अजूनही काही भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांच्या गारपिटीनं ज्वारींचं नुकसान झालं.
लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय. काल संध्याकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि वादळी वारे सुरू होतं. काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावल्यानंतर रात्री लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे शेती पिकांचे काही अंशी नुकसान झालं आहे. ज्यात गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे काही अंशी नुकसान झालं आहे.