लातूर : लातूर जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील एकमेव चारा छावणीचेही मोठे नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे जैन मुनिश्री विनम्रसागरजी महाराज यांच्या दिव्य ज्योत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ९७५ जनावरांची एकमेव चारा छावणी सुरू आहे. दुर्देवाने या चारा छावणीला अद्याप एका रुपयाची मदतही मिळाली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानकपणे सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सावलीसाठी केलेले शेड नेट आणि लावलेले खांबही उडून गेले. तर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही उडून गेला. त्यानंतर काही काळ अवकाळी पाऊस पडल्यामुळे उर्वरित चाराही भिजून गेला. यामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या चारा छावणीत खंडाळी, धसवाडी, अंधोरी, येस्तार, पार, डूमनरवाडी, उमटवडी, पांढरेवाडी, कोपनरवाडी, घंटग्रा, गंगा हिप्परगा, नागझरी, उजना, वंजारवाडी, हाळी, हंडरगुळी, टाकळगाव, सुमठाणा या अहमदपूर तालुक्यासह उदगीर तालुका आणि शेजारील परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील जनावरे या चारा छावणीत आहेत.



सुदैवाने जनावरांना या वादळी वाऱ्याचा कसलाही फटका बसला नाही. या चारा छावणीला शासनाचा एकाही रुपयांचा निधी मिळालेला नाही. अहमदपूर तालुकासह गंगाखेड, उदगीर तालुक्यातीलही गावची जनावरे या चारा छावणीमध्ये आहेत.