हिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी
विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.
नागपूर : विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.
अडचणींचा डोंगर
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यातला घोळ, कापसापासून इतर अनेक शेतमालांना योग्य दर मिळत नसल्याने त्रस्त शेतकरी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान, स्रियांचे प्रश्न, प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता यासारखे अनेक मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागणार आहे.
विरोधकांची वाढती धार
फडणवीस सरकारला तीन वर्षं पूर्ण झाल्यावरही राज्याचे प्रश्न मार्गी लागले नसल्याचे सांगत विरोधक एकवटले आहेत. विरोधकांना २०१९ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांची चाहूल लागली आहे. त्यातच गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधाची धार तेज झालेली आहे. भाजप विरोधात एकंदरीतच वातावरण तापलेलं आहे. त्याचा फायदा घेत महाराष्ट्रातही फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
जोरदार टक्कर
त्यातच भर म्हणून १२ डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनावर एक संयुक्त मोर्चा आयोजित केला आहे. शरद पवार आणि राहुल गांधी हे दोघेही या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांना या अधिवेशनाच्या निमित्ताने असंख्य आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलंय तसच त्यांना ते यावेळेस सुद्धा शक्य होतं का ? याकडेच सर्वांचं लक्ष लागलयं.