राज्यात 24 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर, मुंबई-पुणे-नागपूरची चिंता वाढली
राज्यात ( Maharashtra) पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात ( Maharashtra) पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. रुग्णवाढ थांबली नाही तर काही शहरात लॉकडाऊन करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच राज्यात कडक निर्बंध आणावे लागतील, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेऊ शकतात, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी दिल्या जाताहेत. त्यातल्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आता 28 दिवसाऐवजी 45 ते 60 दिवसांनी दिला जाणार आहे.
तशा सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या. कोविशिल्ड लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे कोव्हॅक्सिनच्या लसीचा दुसरा डोस मात्र आधीप्रमाणं 28 दिवसानंतरच दिला जाणाराय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिलीय.
राज्यात कोरोनाचे 24,645 नवे रुग्ण आढळून आलेत. काल तब्बल 30 हजार ५३५ रुग्ण वाढले होते. गेल्या 24 तासांत मुंबईत 3262, पुण्यात 2365, नागपुरात 2741 रुग्णांची नोंद झालीय. तर काल दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजारांवर पोहोचली आहे.
अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक
मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोनासाठी अँटीजन टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलंय. त्याप्रमाणे मुंबईतल्या अनेक मॉल्समध्ये प्रवेश करण्याआधी मॉलबाहेर अँटिजन टेस्टिंग सुरू करण्यात आलीय. पण या टेस्ट नागरिकांना स्वखर्चानं कराव्या लागतील. वरळीच्या अट्रिया मॉलसह काही मॉलमध्ये या टेस्टसाठी 250 रुपये मोजावे लागताहेत. मात्र हा सरकारचा निर्णय आहे आम्ही पैसे का देऊ, आमची मोफत चाचणी करा अशी मागणी करत नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरू झालंय. तर खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना ही देण्यात आल्यात. हे सगळं करत असताना राज्य सरकारकडून महापालिकेला अपेक्षित आर्थिक साहाय्य मिळत नसल्याची खंत महापौरांनी व्यक्त केलीय. त्यांनी आज जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी केली.
पिंपरी चिंचवड शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात नवे निर्बंध लागू केलेत. त्यानुसार आता या परिसरात सम विषम तारखेला दुकाने उघडता येतील. पण व्यापाऱ्यांनी तो आदेश धुडकवत दुकाने चालू ठेवलीत. आधीच नुकसान भरपूर झालंय पुन्हा दुकानं बंद करणं परवडणारं नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणंय.
बारामतीतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामतीतली आस्थापना आणि दुकानं आजपासून सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेमध्येच सुरू राहणार आहेत. हॉटेलातील पार्सल सेवा सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत चालू राहील. तर सूर्यनगरी पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केली आहे.
बारामतीत मागील पाच दिवसांमध्ये तब्बल पाचशे कोरोणा ग्रस्त आढळून आल्याने चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा आकडा वाढत असताना सरकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतीमध्ये कामगार कार्यालय आहे. सध्या या कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. त्यामुळे या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.