Pune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत.
Pune Corona update : चीनमध्ये (China Corona) अतिरिक्त निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णसंख्येचा (China Coronavirus) मोठा स्फोट होताना दिसत आहे. वाढत्या करोनो रुग्णसंख्येमुळे चीनच्या आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झालाय. अशातच जगभरातही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. अशातच पुणेकरांना (Pune News) धडकी भरणारी माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावर (Pune airport) सिंगापूरहून (Singapore) परतलेली एक महिला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळली आहे. या महिला प्रवाशाचे नमुने जीनोम सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत. सध्या पुण्यात कोरोनाचे 54 सक्रिय रुग्ण आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी पुणे विमानतळावर केली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेतही जवळपास 48000 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी सक्तीची करत पुढील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे विमानतळावर कोविड 19 पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचं वय 32 वर्षे आहे. ही महिला कोथरूडची आहे. या महिलेमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी कोरोना चाचणीत तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व तपशील समजणार असल्याचा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तोपर्यंत महिलेला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित महिलेबाबत काळजी करण्यासारखे काही नाही. त्यामुळे तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ताजमहाल पाहण्यासाठी आलेला पर्यटकही कोरोनाबाधित
दुसरीकडे, दिल्लीत ताजमहाल पाहण्यासाठी आलेला अर्जेंटिनामधील एक पर्यटक देखील कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. ताजमहालच्या प्रवेशद्वारावर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. धक्कादायक म्हणजे, अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्ती बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता आग्रा पोलीस आणि आरोग्य विभागाने या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
भारताची सतर्कतेची भूमिका
चीनसह अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन भारताला आधीच सतर्क करण्यात आले आहे. केंद्र सरकारने विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय प्रवासादरम्यान आणि विमानतळावर मास्क वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याच सूचनांनंतर संबंधित प्रवाशाची पुण्यात चाचणी केली असता संबंधित महिला प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.