परभणी : गेल्या काही महिन्यापासून एक महिलांची टोळी दुकानदारांचे लक्ष विचलित करून भुरट्या चोऱ्या करत आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात ही टोळी सक्रिय झाली आहे. एका सोन्या चांदीच्या दुकानात हात साथ साफ करून या टोळीने पोबारा केला आहे. दरम्यान, या चोरटी घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरीची उकल झाली. त्यानंतर दुकान मालकाने चोरीसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिंतूर शहरातील दुर्गेश रोकडे यांचे जय भवानी ज्वेलर्स मुख्य बाजारपेठेत आहे. त्यांचा नौकर आणि ते दुकानात दुपारच्यावेळेस असतांना ज्वेलर्स मध्ये चार महिला एका छोट्या बालकासह आल्या. बराच वेळ त्यांनी पायातल्या पैंजनाचे चांदीचे जोड बघितले. पण खूप वेळ चौकशी करूनही त्यांनी काहीच खरेदी न करता परतल्याने रोकडे यांचा संशय बळावला आणि त्यांनी पैंजनाचे चांदीचे जोड मोजले असता नऊ पैंजनाचे जोड कमी असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही चेक केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. यात अंदाजे दहा हजाराचा चांदीचा ऐवज या महिला गँगने पळवल्याचे लक्षात आले.


यातील तीन महिला दुकानदार आणि नोकरांकडे वस्तूंची पाहणी करीत आहेत. तर चौथी महिला बाळ काखेत घेऊन योग्य वेळेची टेहळणी करीत आहे. नोकर आणि दुकानदारांची नजर बाजूला जाताच तिघांपैकी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या हातात काही पैंजनाचे पाकीट दिले आणि तितक्याच चतुराईने दुसऱ्या महिलेने ते पाकीट लपविले. या टोळी विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी पथक नेमली आहेत. पण घटनेने जिंतूर शहरात भीती पसरली आहे.