प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीचा प्रवास मोफत
महिलांना प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेचा पीएमपी प्रवास मोफत देण्याचा निर्णय
पुणे : महिला दिनाच्या औचित्याने आज जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे निमित्त साधत पुणे महानगर परिवहन महामंडळांकडून महिलांना प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेचा पीएमपी प्रवास मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही मोफत सेवा केवळ 'तेजस्विनी' च्या मार्गांवरच असणार आहे. पीएमपीच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीच्या ताफ्यात 37 मार्गांवर तेजस्विनी बस धावत आहेत. त्यातील 9 मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असून 26 मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत.
या बस खास महिलांसाठी सुरू करण्यात आल्या असल्याने महिला दिनापासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला या बसमधील प्रवास मोफत असणार आहे. शहरात असलेल्या एकूण मार्गात केवळ 37 मार्गावरच तेजस्विनी बस धावते. या व्यतिरिक्त इतर मार्गावरही असलेल्या बस मधील महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, पीएमपी संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे केवळ तेजस्विनी बस मार्गावरील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महिला दिनाच्या दिवशीच महिलांमध्ये दुजाभाव होणार आहे.
दरम्यान, 'तेजस्विनी' बसची संख्या टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येत असून ही सवलत केवळ एका वर्षासाठी आहे. त्यामुळे पुढील वर्षात तेजस्विनी बसची संख्या वाढल्यानंतर सर्वच महिलांना ही सेवा मिळणार आहे,’ असा दावा शिरोळे यांनी केला.