शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हरेगाव या जवळपास १० ते १२ हजार लोकवस्तीच्या गावात सहज दारू मिळू लागली. परिणामी हातावर पोट असणाऱ्यांचे संसार या दारूच्या व्यसनामुळे उद्धवस्त होऊ लागले. हरेगावच्या अवैध दारू विक्रीची तक्रार वारंवार देऊनही किल्लारी पोलीस लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांकडून आरोप होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा गावात दारु विक्रीसाठी आली असता महिलानी दारुचे बॉक्सही फोडले. त्यानंतर दारु विक्रेत्यांकडून महिलाना धमक्याही येऊ लागल्या. तर काही दारुड्यांनी नशेत आपले घरच पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या गावातील महिलांनी अखेर किल्लारी पोलिस ठाण्यातच आंदोलन करीत ठिय्या मांडला. 


अचानक झालेल्या या आंदोलनामुळे किल्लारी पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तातडीने दारु विक्रेत्यावर कारवाई करुन कायमस्वरुपी गाव दारुमुक्त करावे, अशी मागणी यावेळी महिला ग्रामस्थांनी केली. 


दरम्यान, आंदोलन चालू असताना औसाचे काँग्रेस आमदार तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील गाडीने जात असताना आंदोलनकर्त्या महिलानी त्यांची गाडी अडवली. तसेच रस्त्यावरच आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर आमदार बस्वराज पाटील यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना किल्लारी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक म्हेत्रेवाड यांना दिल्या. 


दरम्यान या आंदोलनानंतर आता तरी गावातील दारू विक्री थांबविली जाण्याची मागणी आंदोलक हरेगाव येथील महिलांनी केली आहे.