Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video: रिक्षाचालकांकडून दिली जाणारी मुजोर वागणूक हा प्रवाशांसमोरील सर्वाधिक चिंतेच्या बाबींपैकी एक आहे. अनेकदा रिक्षाचालकांबरोबर खटके उडण्याचं कारण ठरतं तो तो म्हणजे मीटर! अनेक रिक्षांमधील मीटर हे कापलेल्या अंतरापेक्षा अधिक रक्कम दाखवतात आणि त्यामुळे प्रवाशांचा रिक्षाचालकांबरोबर वाद होतो. बऱ्याचदा रिक्षाचा मीटर हा गरजेपेक्षा अधिक वेगाने पळत असल्याचं जाणवतं पण आपली फसवणूक होत आहे हे ग्राहकांना सिद्ध करता येत नाही. मात्र आता मुंबई वाहतूक पोलिसांनीच एक व्हिडीओ शेअर करत असे सदोष मीटर कसे ओळखावेत याची माहिती दिली आहे. 


काय आहे व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर व्हिडीओ एका रिक्षात शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील मीटर हा 'घोडा मीटर' असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच घोडा ज्या वेगाने पळतो त्याच वेगाने रिक्षातील मीटर पळत असल्याने त्याला 'घोडा मीटर' असं नाव देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये एका जागी उभ्या असलेल्या रिक्षाचा मीटर कशाप्रकारे वेगाने धावतो हे दाखवण्यात आलं आहे. मात्र हा मीटर वेगाने पळवण्यासाठीचं बटण हे रिक्षाचालकाजवळ पुढे रिक्षाच्या हॅण्डलमागे असते असं व्हिडीओत दिसत आहे. हे बटण सुरु केल्यानंतर मीटर वेगाने पळतो. तर बंद केल्यास सामान्य वेगात मीटर चालतो. मात्र हे बटण सुरु केल्याचं ग्राहकांनाही सहज समजू शकतं. मीटर हा वेगाने पळवला जात असल्याचं कसं ओळखावं याची एक छोटी निशाणी मीटरवरच दिसते. 


कशामुळे कळतं की मीटर वेगवाने सुरु आहे


मीटर वेगाने पळवला जात असेल आणि चालकाने वेगवाने मीटर पळवण्याचं बटण सुरु केलं तर मीटरवर शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट ब्लिंक होतो. म्हणजेच जर मीटर 88.00 रुपये इतका असेल आणि वेगाने मीटर पळवण्याचं बटण सुरु केलं तर मीटरच्या इंडिकेटवर रक्कम '88.00.' अशी दिसेल. या शेवटच्या शून्यानंतरचा पॉइंट म्हणजे मीटर वेगाने पळवण्याचं बटन सुरु असल्याचं दर्शवतो. अशा रिक्षाचालकाची तक्रार त्याच्या रिक्षाच्या क्रमांकासहीत जवळच्या आरटीओ कार्यालयामध्ये करता येईल. 


पोलिसांनी काय म्हटलं?


हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओला, "रिक्षाचे भाडे अचानक कसे वाढे? जाणून घ्या एका तीळएवढा फरक, कशाप्रकारे तुमची फसवणूक कशी करतो! तुमच्या नकळतपणे मिटरमध्ये फेरफार बदल करून आहे त्यापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. हे टाळण्यासाठी जाणकार बना," अशी कॅप्शन देत मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.



पोस्टखालीच माहिलेची तक्रार


पोलिसांच्या या पोस्टखाली एका महिलेने नुकताच तिला असा अनुभव आल्याचं सांगितलं. तसेच यासंदर्भात रिक्षाचालकाला सांगितलं असता तो उद्धटपणे उत्तरं देऊ लागल्याचं या महिलेने सांगितलं. पोलिसांनी या महिलेला नेमकी ही घटना कुठे घडली यासंदर्भातील माहिती द्यावी अशी विनंती केली आहे.