Mumbai News Today: मुंबईत उड्डाणपुलाचे जाळे बांधण्यात येत आहे. वाहतुककोंडीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी महानगरपालिका आणि MMRDA कडून शहरातील महत्त्वाच्या परिसरात प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे कामही जोरात सुरू आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतील एक महत्त्वाचा रस्ता सात महिन्यांसाठी बंद राहणार आहे. वाहतुक विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोड हा मुंबईसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोस्टल रोड म्हणजेच सागरी किनारा मार्ग, समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळं वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण  झाले आहे. उर्वरित कामाला वेग देण्यासाठी वरळी सीफेसवरील एका मार्गिकेची वाहतूक सात महिन्यांसाठी बंद होणार आहे. 4 नोव्हेंबर 2023 ते 31 मे 2024 या सात महिन्यांसाठी वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. 


वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहणार 


सी फेसच्या खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शन, प्रभादेवीच्या दिशेने जाणारी ही मार्गिका आहे. फक्त वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून खान अब्दुल गफार खान उड्डाणपूल ते वरळी नाका-पोदार जंक्शन या मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासोबतच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनहून उजवीकडे वळल्यावर सर पोचखानवाला मार्ग येथून जे. के. कपूर जंक्शन येथे पोहोचता येईल.


कोस्टल रोडचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून या नोव्हेंबरमध्ये प्रकल्पाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता होती. मात्र, मार्गिका खुला झाल्यास इतर कामावर परिणाम होईल म्हणून हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळं आता कोस्टल रोडची एक मार्गिका मे 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. 


कोस्टल रोडमुळं वाहतुक कोंडी फुटणार


कोस्टल रोडच्या कामासाठी तब्बल साडेबारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिला टप्पा दहा किलोमीटरचा असून तो मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत आहे. या प्रकल्पामुळं वाहतुक कोंडी कमी होणार आहे. तर, मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या ८ मिनिटांत कापता येणार आहे.कोस्टल रोडच्या पहिल्या टप्पा वांद्रे- वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हपर्यंत असून यात बोगदा व समुद्राच्या आतून रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसंच, समुद्रावर पुलही उभारण्यात येणार आहे.