यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली `काळी दिवाळी`
काळ्या रंगाच्या रांगोळीवर काळी दिवाळी लिहून रिकाम्या पणत्या ठेवण्यात आल्या.
यवतमाळ : शेतकरी विरोधी सरकारी धोरणाचा निषेध नोंदवित यवतमाळच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त बोथबोडन गावात आत्मक्लेश करीत शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. बोथबोडन या गावात आतापर्यंत २९ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. राज्यपातळीवरीलच नव्हे, तर देशपातळीवर नेत्यांनी बोथबोडन गावात प्रत्यक्ष भेट दिली. मात्र, ठोस उपाय योजना करण्याच्या दृष्टीने कुणीही पुढाकार घेतला नाही.
बिकट परिस्थिती
भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते. मात्र, कुठल्याही आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत झाली नाही. आलेल्या योजना केवळ कागदोपत्री राबवण्यात येत असून, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
वारंवार होणाऱ्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.
शेतकऱ्यांचा आत्मक्लेश
विशेष म्हणजे बँका कर्ज देत नाही, तर शेतमालास योग्य हमीभाव नाही, सोबत हमीभावानुसार सोयाबीन, कापूस आदींची खरेदीसुद्धा होत नाही. अशा समस्या शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या.
यावेळी गावात काळ्या रंगाच्या रांगोळीवर काळी दिवाळी लिहून रिकाम्या पणत्या ठेवण्यात आल्या. शिवाय हातावर व कपाळावर काळी पट्टी बांधून शेतकऱ्यांनी आत्मक्लेशही केला.