यवतमाळमध्ये पोलिसालाच चिरडलं; भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Yavatmal Accident : यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवमाळमध्ये (Yavatmal Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर (Nagpur Tuljapur National Highway) वाहनांची तपासणी करणाऱ्या हायवे पोलिसांच्या (Highaway Police) वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक पोलीस कर्मचारी (Yavatmal Police) व आयशरचा चालक जागीच ठार झाले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोसदणी घाटात हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. महामार्ग पोलीस यावेळी एक ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेला पोलीस कर्मचारी हा तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडला गेला. या अपघातत संजय नेटके या पोलीस कर्मचाऱ्याचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
कॅनॉलमध्ये पडलेल्या रेडकूला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्नात 20 वर्षाचा युवक वाहून गेला आहे. प्रशांत दळवी असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू होता. अखेर दोन दिवसांनी प्रशांत दळवीचा मृतदेह सापडला आहे. प्रशांत शुक्रवारी गुरं चरण्यासाठी श्री बाळोबाच्या खिंडीकडे गेला होता. दुपारी उरमोडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात रेडकू पडले. कॅनॉल मधील वाहत्या पाण्यात रेडकू वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी तो कॅनॉलच्या कडेने रडत पळत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले.
उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे कॅनॉलमध्ये उतरू नकोस असेही त्यांनी सांगितले होते. मात्र काही अंतरावर कॅनॉलच्या कडेला प्रशांतची दैनंदिन वापरातील चप्पल, टॉवेल, छत्री, डबा, पिशवी अस साहित्य मिळून आले. सर्व जणं शोध घेत पुढे गेले असता आर्वी-कोंबडवाडी हद्दीत असलेल्या तलावानजीक पाण्यात वाहून आलेले रेडकू जखमी झालेल्या अवस्थेत मिळून आले. पण प्रशांत दळवी मिळून आला नव्हता. मात्र दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे.