श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एका आईने दोन मुलांनी विषारी औषध पाजून स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हादरवणाऱ्या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलीस (Yavatmal Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन चिमुकल्यांना वीष पाजून आईने देखील विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या ऊमरखेड तालुक्यातील निंगणुर येथे घडली आहे. यात आईसह दोन्ही निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रेश्मा नितीन मुडे असे मृत आईचे नाव आहे तर सहा वर्षीय श्रावणी आणि तीन वर्षीय सार्थक असे मृत बालकांची नावे आहेत. रेश्माने हा विषप्रयोग केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली.


हा सगळा प्रकार कळताच कुटुंबियांनी तिघांनाही तात्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारदरम्यान तिघांच्याही मृत्यू झाला. रेश्माने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान बिटरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी रेश्मा मुडे यांनी आधी दोन बालकांना विष पाजले. यानंतर त्यांनी स्वतःही विष प्यायले. तिघांचीही प्रकृती खराब झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या आधीच दोघांचा मृत्यू झाला होता. तर श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाला.


सन्मान सोहळ्याआधीच डॉक्टरची आत्महत्या


जळगाव जिल्ह्यातील अंजन विहिरे येथे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानासाठी निघालेल्या एका डॉक्टरने तापी नदी वरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून डॉ. व्ही. आर. पाटील असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. व्ही. आर. पाटील हे पाळधी येथील रहिवासी होते. जळगावकडे चार चाकी वाहनाने जात असताना तापी नदीच्या पुलावर चार चाकी उभी करून पुलावरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली असून घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे.