पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका माथेफिरु जावयाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चौघांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावयाने निर्घृणपणे हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी जावयाला अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन हा हत्याकांडाचा थरार घडल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस (Yavatmal Police) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा येथे हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गोविंद विरचंद पवार यास अटक केली आहे. पारधी बेड्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावरून आरोपी गोविंद विरचंद पवार याने चौघांची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या हत्याकांडात सासरा पंडित घोसले, मेहूणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला आहे. तर गोविंद पवार याची सासू रुखमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपीने चौघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंदची पत्नी तिरझडा पारधी बेड्या येथे राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंदला होता. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला मारहाण देखील करत होता. त्यामुळे रेखा काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. गोविंदने त्यानंतर माहेरच्या लोकांसोबतही भांडण सुरु केले.
मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास गोविंद रेखाच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने कुटुंबातील रेखा आणि तिच्या कुटुंबियांवर वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात रेखा, तिचे दोन्ही भाऊ आणि वडील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. रुखमा घोसले यांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंब पोलिसांनी याप्रकरणी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे.