यवतमाळ : यवतमाळमध्ये  पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय.... पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण प्राधिकरणच्या एका अभियंत्याला मारहाण करण्यात आलीय. वडगाव चौकात पाणीटंचाईमुळे हैराण ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत यवतमाळ आर्णी मार्ग बंद पाडला. या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचीही गाडी अडवण्यात आली.  त्यानंतर माणिकराव ठाकरेंनी स्थानिकांशी चर्चा करुन पाणीटंचाईचं भीषण वास्तव जाणून घेतलं.  आंदोलनस्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, तहसीलदार आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी समजूत काढायला पोहोचले.


'आधी पाणी द्या मग चर्चा करा'


 संतप्त आंदोलकांनी 'आधी पाणी द्या मग चर्चा करा' अशी भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर जीवन प्राधिकरणाच्या एका शाखा अभियंत्याला नागरिकांनी मारहाणही केली.  तसंच  पाणीप्रश्नासाठी  नागपूर तुळजापूर मार्गावरही नागरिकांना रास्तारोको केला. रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. मानवी साखळी करुन  भोसा परिसरात घाटंजी आर्णी मार्ग रोखून धरण्यात आला. स्थानिक शिवसेना पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.