श्रीकांत राऊत, झी मीडिया: मुलांना असलेले मोबाईलचे वेड, मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम या समस्येवर यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतने ईलाज शोधला आहे. 18 वर्षे वयाखालील किशोरवयीन मुलां मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामसभेने (Gram Sabha) घेऊन मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रयोग केला आहे. (yavatmal gram sabha decision to not allowed using mobile phones for teenagers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्यस्थितीत लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते. उठता, बसता, जेवताना देखील मुलांना मोबाईल हातात लागतो, त्यातल्या त्यात किशोरवयीनांमध्ये मोबाईल गेम खेळाची क्रेझ आहे. मोबाईलचा हा मुलांकडून होणारा अतिवापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी (Headache) ठरत असून, खेळ व अभ्यासात दुर्लक्ष, विविध आजार, सायबर गुन्हेगारी अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल नको म्हणून ठराव घेतला आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.


तरुणाईला चांगले वळण लागावे, त्यांचे शिक्षण, खेळ (Education) व आरोग्याकडे लक्ष रहावे, पालकांसोबतच ग्रामस्थांशी मुलांचा संवाद वाढवा, सायबर गुन्हेगारी पासून मुलं दूर राहावी यादृष्टीने ग्रामसभेत चर्चेअंती गावातील 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. आता गावात दवंडी करून या निर्णयाबाबत जनजागृती तसेच पालक व मुलांना मार्गदर्शन (Guidelines) करण्यात येणार आहे.


याशिवाय ग्रामसभेत शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhanmantri Surksha Vima Yojna) लागु करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचायतरराज व्यवस्थेत ग्रामसभाला देण्यात आलेले अधिकार हे महत्त्वाचे आहेत. त्याचाच वापर करीत बांशी ग्रामपंचायतने हे तीनही ऐतिहासिक निर्णय घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.