श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल शिंदे यांच्या शेतातील कपाशीचं प्रत्येक बोंडं गुलाबी बोंड अळीनं पोखरुन टाकलंय. हातातोंडाशी आलेलं पीक बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळं वाया गेलं आहे. त्यामुळं हाताश झालेल्या शिंदे यांनी काळजावर दगड ठेवून कपाशीच्या पिकावर नांगर फिरवला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाई गावात राहणाऱ्या विशाल शिंदे यांची दोन एकर शेती असून, बँकेनं पीक कर्ज देण्यास नाकार  दिल्यामुळं खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांनी कपाशीचं पीक घेतलंय. बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिंदे यांनी बीटी बियाणं पेरलं. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.


बोंडअळीने उद्धवस्त झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचं आश्वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिलं होतं. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाची दखलही घेतली नसल्याचं चित्र आहे.त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाली कोण ? हाच खरा प्रश्न आहे.