यवताळमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या `भारत बंद`ला हिंसक वळण
यवतमाळमध्ये बहुजन क्रांती मोर्चा ने पुकारलेल्या `भारत बंद`ला हिंसक वळण
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये बहुजन क्रांती मोर्चा ने पुकारलेल्या 'भारत बंद'ला हिंसक वळण आले. दिवसभरात तीनदा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. सकाळी अग्रसेन चौकात व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केल्यानंतर आंदोलक कार्यकर्त्यांनी जबरीने दुकानात शिरून दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. शिवाय दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते. यावेळी व्यापारी आणि बहुजन क्रांती मोर्चार्चे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला.
व्यापाऱ्यांनी दुकान बंद करावे म्हणून आंदोलकांनी गोंधळ घालीत दुकानातील साहित्याची नासधूस सुरु केल्याने व्यापाऱ्याने मिरची पावडर भिरकावून आंदोलकांना पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सौम्य लाठीमार केल्याने आंदोलक पसार झाले.
त्यानंतर बसस्थानक चौकात देखील बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांशी वाद घातल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर देखील आंदोलकांनी चक्काजाम केले व शहरातून मोर्चा काढला. हा मोर्चा शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जुनी मेनलाईन मध्ये पोहोचला असता जी दुकानं सुरू होती.
ती पुन्हा बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती चिघळत असल्याचे बघून मोठ्या संख्येने असलेल्या जमावावर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून अनेक दुचाकी वाहनांचे नुकसान झाले शिवाय लाठीचार्ज आणि पळापळीत काहीजण जखमी झाले. पोलीस आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यात झालेल्या या धुमश्चक्रीमुळे शहरात परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.