अस्थी विसर्जन करुन परतताना अपघात, सातजण ठार
भीषण अपघातात 7 जण जागीच ठार तर 10 जण गंभीर
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : अस्थी विसर्जन करुन परत येत असलेल्या मालवाहू वाहन झाडाला धडकल्यानंतर खोल खड्ड्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात सातजण जागीच ठार तर दहाजण गंभीर झाले आहे. अपघाताची ही घटना आज सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढोणा येथे घडली.
महादेव बावनकर रा. शेंदुर्जना घाट, किसन कळसकर, महादेव चंदनकर, गणेश चिंचोळकर, कृष्णा प्रसन्नकर, अंजना वानखेडे आणि वाहनचालक अमर आत्राम असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांच्या अंत्यक्रियेतील तिसऱ्या दिवशी कुटुंबीय नातेवाईकांसह कोटेश्वर देवस्थान येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते.
अस्ती विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहा कडे मॅक्झिमो वाहन क्रमांक एम एच ३१ पीक्यू २७७४ ने परत येत असताना जोडामोहा मार्गावर चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून थेट खोल खड्ड्यात कोसळले.
या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दहाजण जखमी आहेत. जखमींना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.