कारभाराला कंटाळुन नगरसेवकाची कार्यालयात तोडफोड
नगरसेवकानेच कार्यालयात तोडफोड केल्याने खळबळ
यवतमाळ : यवतमाळच्या दिग्रस नगर पालिकेच्या कारभाराला कंटाळुन नगरसेवकानेच कार्यालयात तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेचे अधिकारी काम करीत नाहीत मग त्यांच्या खुर्च्या कार्यालयात कशाला ? असा प्रश्न करीत नगरसेवक सैयद अक्रम यांनी दुसऱ्या माळ्यावरील पाणीपुरवठा विभागातील खुर्च्या तळमजल्यावर फेकल्या.
सर्वसाधारण सभेत ठराव होवुन देखील दिग्रसचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे अश्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अक्रम यांनी कार्यालयातील खुर्च्यां खाली फेकल्या. मोतीनगर प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने सैय्यद अक्रम यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या.
वारंवार तक्रार करुन देखील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने मोतीनगरच्या महीला पालिकेवर धडकल्या, अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सय्यद अक्रम यांनी दुमजली इमारतीवरून कार्यालयातील खुर्च्या खाली फेकल्या. समस्या कायम सोडविण्यात आली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.