यवतमाळ : पेट्रोल डिझेल दरवाढ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली. दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात रावसाहेब दानवे विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पुतळ्याला चपलांनी बदडल्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिक आणि पोलिसात चांगलीच झटापट देखील झाली.


मला ही गाडी शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकसहभागातून गाडी दिलीय. दानवे जर शेतकऱ्यांचा अपमान करत असतील तर याची गरज काय ? दानवेंची जीभ कापणाऱ्यास ही गाडी मी भेट देईन तसेच १० लाखाच बक्षीस देईन असे संतोष ढवळे म्हणाले. 



या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये दोन गट असले तरी दानवेंच्याविरोधात दोन्ही गट एकत्र आलेले दिसले. पोलिसांसमोर ढवळे यांनी हे खळबळजनक आवाहन केलं. याआधी देखील ढवळे यांनी अशा प्रकारचे विधान केले होते. त्यावेळी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असे विधान रावसाहेब दानवेंनी केले होते. या विधानाचा शिवसैनिकांकडून राज्यभरात निषेध नोंदवला जातोय.