चेतन कोळस, झी २४ तास, येवला : स्वयंपाकात चव आणणाऱ्या कोथिंबिरीनं नाशिक जिल्ह्यातल्या दोन शेतकऱ्यांचं नशीब पालटवून टाकलंय. अवघ्या पन्नास दिवसात दोन शेतकऱ्यांना तब्बल १७ लाखांचं उत्पादन या कोथिंबिरीनं मिळवून दिलंय. एरव्ही पाच दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर गेल्या महिन्याभरापासून फारच भाव खातेय. याच कोथिंबिरीनं दोन शेतकऱ्यांचं आयुष्य बदलवून टाकलंय. निफाड तालुक्यातल्या कोकणागावच्या आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांनी फक्त ५० दिवसांत तब्बल १७ लाख रुपयांचं उत्पन्न कोथिंबिरीतून मिळवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसिफ आणि सुरेश यांनी साडे तीन एकर जमिनीवर कोथिंबिरीची लागवड केली होती. दुष्काळी स्थिती आणि पावसानं केलेला उशीर अशा स्थितीतही ही कोथिंबीर शेतकऱ्यांनी जगवली. बाजारात आवक कमी असताना काढणीला आलेल्या कोथिंबीर व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावरच खरेदी केली. या कोथिंबिरीला तब्बल १७ लाखांचा भाव मिळालाय.


सध्या फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर सुरेश आणि आसिफ हिरो झालेत. पिकांच्या लावणीचं आणि उत्पादनाचं स्मार्ट नियोजन केलं की त्याचा स्मार्ट परतावा मिळतो, हे आसिफ आणि सुरेश यांनी दाखवून दिलंय. कोणतं पिक कोणत्या काळात घ्यावं? आणि त्याचं कसं नियोजन करावं? याची यशस्वी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.