सातारा : साताऱ्यातील कास भागत सेल्फी काढताना एक तरुण ६०० फूट दरीत पडल्याची घटना घडली आहे.तब्बल २५ तास हा तरुण या दरीत होता त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आल्याने त्याचा जीव वाचला आहे. शिवेंद्सिंहराजे रेस्क्यु टीमने शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला दरीतून बाहेर काढले त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा जिवावर बेतल्याची अनेक प्रकरणं घडली आहेत .पुन्हा एकदा सेल्फीमुळे साताऱ्यातील या तरुणाला तब्बल २५ तास मृत्यूशी संघर्ष करावा लागला आहे. साताऱ्याच्या यादोगोपाळ परिसरात राहणारा २२ वर्षीय कनिष्क जांगळे गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण आज शुक्रवारी सकाळपर्यंत देखील तो परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती.



गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ त्याची मोटारसायकल सापडल्यामुळे कुटुंबियांना संशय आला. त्यांनी अजून पुढे जाऊन पाहिल्यानंतर दरीत सुमारे ६०० फुटांवर कुणीतरी पडल्याचं दिसून आलं. सारा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलली आणि शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यु टीमला पाचारण केलं.


दुपारपासून रेस्क्यु टीमने खोल पडलेल्या कनिष्कला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी टीममधील एक तरुण खोल दरीत उतरला. तो कनिष्कपर्यंत पोहोचला तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. क्रेनच्या सहाय्याने कनिष्कला वर खेचण्यात आलं. तो शुद्धीवर आल्यानंतर सगळा प्रकार समोर स्पष्ट झाला.त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत