शोरुममधून तो स्कुटीची ट्रायल मारायला घेऊन गेला, सेल्समन अजून वाटच पहातोय
शोरुममधून नवी कोरी इलेक्ट्रीक स्कुटी घेऊन तरुण पळाला, सीसीटीव्हीमध्ये कैद
जालना : मला इलेक्ट्रिक स्कुटी घ्यायची आहे, या स्कुटीवरून मला एक ट्रायल मारू द्या असं शोरूम मधल्या सेल्समनला सांगून एका तरुण नवीकोरी इलेक्ट्रीक स्कुटी घेऊन फरार झाला. जालनातील भोकरदन नाका परिसरातील NRG ऑटो इलेक्ट्रिक इंडस्ट्रीजच्या शोरुममध्ये ही घटना घडली आहे.
याप्रकरणी शोरुममधील सेल्समनच्या फिर्यादीवरुन ३० ते ३२ वर्षांच्या अज्ञात आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एक 30 ते 32 वर्षाचा तरुण ग्राहक म्हणून भोकरदन नाका परीसरातील NRG ऑटो ईलेक्ट्रिक इंडस्ट्रीच्या शोरुममध्ये आला. या वेळी त्याला शोरूम मध्ये कामावर असलेल्या सेल्समननं इलेक्ट्रिक स्कुटी दाखवल्या.
मला इलेक्ट्रीक स्कुटी घ्यायची आहे असं सांगत या तरुणाने स्कुटी चालवून बघू शकतो का अशी विनंती सेल्समनकडे केली. सेल्समननेही स्कुटी शोरुमच्या बाहेर आणत तरुणाला ट्रायल मारण्याची परवानगी दिली. मात्र ट्रायल मारण्यासाठी स्कुटीवरून गेलेला हा तरुण पुन्हा परतलाच नाही.
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं सेल्समनच्या लक्षात आलं. त्याने शोरुम मालकाच्या कानावर ही बातमी घातली. त्यानंतर अज्ञात तरुणाविरोधात सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.