किरण ताजणे, नाशिक : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटर मध्ये सैन्य भरतीची प्रक्रिया सुरु आहे... या सैन्य भरतीसाठी राज्य भरातून प्रशिक्षणार्थी नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. मात्र या भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची कोणतीही व्यवस्था नसल्याने कडाक्याच्या थंडीत या तरुणांचे प्रचंड हाल झाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना रस्त्याच्या कडेला झोपावं लागलं. नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर मध्ये सैन्य भरती असल्याची जाहिरात काही दिवसांपूर्वी आली, फक्त ६८ जागांसाठी दहा ते बारा हजार तरुण आले होते. पण या तरुणांसाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत अनेकांना फुटपाथवरच रात्र जागून काढावी लागली. धक्कादायक म्हणजे एवढी चेंगराचेंगरी झाली की काही तरुणांना मारहाणही झाली. 


भरतीच्या ठिकाणी झालेल्या गोंधळात आणि गर्दीत अनेकांच्या चपला बूटही हरवले. काही जणांची तर महत्त्वाची कागदपत्रंही हरवली. अनेकांवर अनवाणी परतीचा प्रवास करण्याची वेळ आली. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून आलेल्या या तरुणांना निराशा पदरी घेऊन घरी परतावं लागलं आहे. तीन दिवस नाशिकमध्ये ही भरती प्रक्रिया चालणार आहे. दरवर्षी असाच गोंधळ होतो, पण यातून प्रशासन कुठलाही धडा घ्यायला तयार नाही.