चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : मलंगगड परिसरातील संतापजनक घटना घडली आहे. टवाळखोर मुलांनी तरुणींचा विनयभंग केला आहे. (molesting the young woman) केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण काढत मलंगगडच्या ( Malanggad) पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी  बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही तर त्यांनी  दोन्ही तरुणीचे कपडे फाडण्याचा (Harassment) प्रयत्न करत विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पलावा परिसरात राहणारे दोन तरुण दोन तरुणी असे चौघे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याचवेळी तरुणींनी घातलेला तोकड्या कपड्यांमुळे काही टवाळखोर 6 ते 8  तरुणांच्या जमावाने तरुणींची छेड काढण्यास सुरुवात केली.


तसेच काही क्षणातच या तरुणांनी तरुणींच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. बराच वेळ हे तरुण या मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मित्रांना काठ्यांनी मारत होते. या चौघांनी कशीबशी या तरुणाच्या तावडीतून सुटका करत तेथून  दुचाकीवरून पळ काढल्याने त्यांची सुटका झाली. तेथून त्यांनी थेट गाडीने पोलीस चौकी गाठले आणि त्याठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी मेडिकल करून या, इथे तुमची तक्रार घेणार नाही. तुम्ही लाईन पोलीस स्टेशनला जा, असा सल्ला दिल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.



या तरुणांनी अखेर सोशल मीडियाचा आधार घेत इंस्टाग्रामवरून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर अनेकांनी त्यांची ही पोस्ट मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत शेअर केली आणि न्यायाची मागणी केली. यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी हिल लाईन पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला आहे. या मारहाणीचे वळ त्यांच्या पाठीवर आणि पोटावर उठले असून बाटल्याच्या काचा लागल्याने त्यांच्या हाताला, खांद्याला आणि गळ्याला देखील जखमा झाल्या आहेत.


याबाबत उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. याघटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का, तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.