कंजारभाट समाजातील तरुणांचा `व्हर्जिनिटी टेस्ट`विरुद्ध एल्गार!
लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची `व्हर्जिनिटी टेस्ट` करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला चिटकून बसलेल्या कंजारभाट समाजाला याच समाजातील तरुणांनी आव्हान दिलंय.
मुंबई : लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची 'व्हर्जिनिटी टेस्ट' करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला चिटकून बसलेल्या कंजारभाट समाजाला याच समाजातील तरुणांनी आव्हान दिलंय.
टेक्नोलॉजिचा वापर
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात कंजारभाट समाजातील तरुणींनी टेक्नोलॉजीचा वापर समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी केलाय. या समाजातील काही शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन या अमानवीय कुप्रथेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
व्हॉटसअप ग्रुप
या समाजातील तरुणांनी एक व्हॉटसअप ग्रुप बनवलाय. जो या विषयावर तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करणार आहे. या तरुणांनी या कुप्रथेविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केलीय.
आम्ही फेसबुकवर तीन तलाक आणि राइट टू प्रायव्हसीसारख्या विषयांवर आमचं म्हणणं मांडलं होतं... आमच्या समाजातील बौद्धीक वर्गाकडून आम्हाला त्यावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर याच पद्धतीची अत्याचारी परंपरा संपवण्यासाठी आम्ही एकत्रित आलोत, असं या व्हॉटसअप ग्रुपचा संस्थापक विवेक तमाईचेकर यानं म्हटलंय.
अमानवीय 'व्हर्जिनिटी टेस्ट'
कंजारभाट समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याच्या अनेक घटना उघड झाल्यात. या कुप्रथेतून महिलांचं शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या रात्री तरुण-तरुणीच्या शरीरसंबंधामध्ये पांढऱ्या कपड्यावर रक्ताचा डाग न पडल्यास तरुणी या टेस्टमध्ये 'नापास' ठरते. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पंचांसमोर कपडे उतरवणं, शरीराच्या नाजूक भागांना चटके देणं, उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढणं असे अनेक पद्धतीचे अमानवीय दंड दिले जातात.
तरुणांना समाजाकडून विरोध
याच व्हॉटसअप ग्रुपच्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट समाजातील काही व्यक्तींचा या कुप्रथा नष्ट करण्याला जोरदार विरोध होतोय. पालक आपल्या मुलींवर असा ग्रुप सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. कळत्या वयात ते कुणाच्या प्रेमात-बिमात पडू नये, यासाठी अनेकदा पालकांकडून आपल्या अल्पवयीन मुला-मुलींची लग्न पार पाडली जातात.