तुमचे धंदे उद्या बंद होतील - राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा
महाराष्ट्र काय आहे हे तुम्हाला उद्या कळेल.
मुंबई : केंद्रातून कुणीही उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. त्यावर इथले नेते गांडुळासारखे बसलेत. पण आम्ही गांडूळ नाही. उद्या शिवसेना पक्ष नाही. तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. महाराष्ट्र काय आहे हे तुम्हाला उद्या कळेल. तुमचे धंदे उद्या बंद होतील, असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिलाय.
शिवसेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूर्ण लक्ष असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष असायलाच हवं. केंद्रीय तपास यंत्रणाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ती ऐकायला हवी.
महाराष्ट्र हा लढणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे. आज त्यांच्याच शिवसेना भवन येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. उद्या हे उपटसोभें विचारतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का ? तर... होय शिवसेना म्हणजे महाराष्ट्र.. हे आम्ही ठणकावून सांगू.
कोणीही उठतो प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र बदनाम करतो. इथले भाजपचे गांडूळ शांत बसलेत. पण, महाराष्ट्र उसळेल. नुसतं उठणार नाहीत शिवाजी महाराजांचे वंशज आहोत हे दाखवून देऊ. त्यांच्या रक्तात नाही पण आमच्या रक्तात धाडस आहे, ते दाखवून देऊ, असे ते म्हणाले.
उद्या स्वतः पक्षप्रमुखांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल. ही पोलखोल नाही, त्याना खोलायला किती वेळ लागतो ? ते पोकळ आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.