वैभव बालकुंदे, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Latur Crime News:  प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तरुणाच्या नाका-तोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली होती. त्याच्यावर पंधरा दिवस उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बळीराम नेताजी मगर असं या मुलाचे नाव आहे. (Latur Love Affair News)


लातूर जिल्ह्यातील भादा येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दिवसांनंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. या तरुणाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाल्याची खळबळजळ घटना औसा तालुक्यातील भादा येथे उघडकीस आली आहे. 


प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण


भादा येथील वीस वर्षीय तरुण बळीराम नेताजी मगर याचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराम नेताजी मगर याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय गावातील मुलीच्या घरच्यांना होता. या बाबत जाब विचारण्यासाठी त्यास 3 तारखेला बोलावून घेण्यात आले. 


नाका-तोंडात मिरची पावडर टाकली


तरुण निरोप मिळाल्यानंतर तिथे पोहोचताच भादा गावाच्या शिवारात त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमीझाल्यामुळं त्याच्या नातेवाईकांनी त्याला लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 


पंधरा दिवसांनंतर मृत्यू


तरुणाला झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सदर तरुणाच्या नातेवाईकांनी भादा पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तत्काळ यातील पाच आरोपींनी अटक केली आहे. मात्र, पंधरा दिवसांच्या उपचारानंतरही सदर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्याचा मृत्यू झाला. भादा पोलिसांनी आता गुन्ह्यातील कलम वाढवून आता खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 


पुण्यात आढळले दाम्पत्याचे मृतदेह


पुण्यात राहत्या घरात जेष्ठ जोडप्याचा मृतदेह सापडला होता. राहत्या घरात पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे तर पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. हेमंत रामकृष्ण थोरात (64) आणि सुनीता हेमंत थोरात (58) अशी मयत पती-पत्नींची नावे आहेत. शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळजवळ हे दोघे पती-पत्नींची राहत होते.