Crime News : पुण्यात Interview देण्यासाठी आलेला तरुण रेल्वे स्टेशनवरुन बेपत्ता; CCTV फुटेजमध्ये महत्वाचा पुरावा
Crime News : हा तरुण पुणे रेल्वे स्थानकातून अचानक गायब झाला कसा? तो कुठे गेला? त्यात CCTV फुटेजमध्येही हा तरुण दिसत नसल्याने याचे बेपत्ता होण्यामागचे गूढ आणखी वाढले आहे.
Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकात सापडलेली बॉम्ब सदृश्य वस्तु, स्थानकातूनच झालेले सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण या घटना ताज्या असतानाच अशीच एक घटना घडलेय. गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकातून (Pune railway station) उच्चशिक्षित तरूण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे (Pune Crime News).
चार दिवसांपुर्वी हा तरूण पुण्यात इंटरव्युव्ह देण्यासाठी आला होता. रेल्वे पोलिस आणि लोहमार्ग पोलिस या तरूणाचा शोध घेत आहेत. मात्र, हा तरूण रेल्वे स्थानकाबाहेर गेल्याचे किवा कोणत्याही रेल्वेत चढला नसल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे.
अल्केश रमेशभाई व्यास (वय 36, रा.राजकोट गुजरात) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
8 मार्च रोजी अल्केश पुण्यात टीसीएस कंपनीत इंटरव्युव्ह देण्यासाठी आला होता. रात्री 11.20 वाजता तो पुणे स्थानकावर आला. पुणे स्थानकावरील डोअरमेट्री येथे त्याने चेक इन केले आणि दुसर्या दिवशी सकाळी 6 वाजता चेक आऊट केले. त्यावेळी अल्केश हा 6 ते 6.20 दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर फिरताना दिसला. मात्र, त्यानंतर हा तरूण येथून गायब झाला.
दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस आणि लोहमार्ग पोलिस यांनी त्याचा CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो स्थानकातून बाहेर जाताना आणि रेल्वेमध्ये चढून जाताना दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आलेल्या कोणत्याही सीसीटिव्हीमध्ये दिसला नाही. मग हा तरूण गेला कुठे? असा प्रश्न सध्या त्याच्या कुटूंबियांना पडलेला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पटेल करत आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.