Ganeshotsav 2023 : देशभरात गणेशोत्सवाची धूम उडाली आहे. अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव ठेपला आहे. अशातच तरुण लेखक, विचारवंत सुरज एंगडे (Suraj yengde) यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात दहा दिवस तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. एक दिवस उत्सव साजरा करून नऊ दिवस तरुणांनी सरकार, प्रशासन पोहचलेले नाही अशा ठिकाणी जाऊन विधायक कामे केली पाहिजेत, असे मत सुरज एंगडे यांनी मांडलं आहे. सुरज एंगडे यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरज एंगडे यांच्या कास्ट मॅटर्स या पुस्तकाचे मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशन केले आहे. त्यानिमित्त थेट-भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरज एंगडे बोलत होते. गणेशोत्सव असेल किंवा कोणत्याही जयंती असतील, त्या एका दिवसापुरत्या साजऱ्या कराव्यात. उत्सवाचे उर्वरित सर्व दिवस देशकार्यासाठी उपक्रम राबवावेत. ते उपक्रम गणपतीच्या नावे किंवा कोणत्याही महापुरुषाच्या नावे करा, असे एंगडे यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले सुरज एंगडे?


"शहरांपासून खेड्यापर्यंत आता दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या काळात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. राज्यातील तरुणांनी एक दिवस गणेशोत्सव साजरा करून नऊ दिवस सरकार पोहचले नाही, अशा ठिकाणी जाऊन रस्ते, पूल, शाळा, दवाखाने उभारणे आणि या पायाभूत सार्वजनिक सोयी सक्षम करण्याचे काम करावे. गणेशभक्तांनी हे गणेशाच्या नावानेच करावे. पण विधायक कामे केली पाहिजेत," असे सुरज एंगडे म्हणाले.


जगभरात कम्युनिस्ट सत्ता असलेल्या देशांमध्ये 18 -19 वयाचे तरुण देशकार्यासाठी काम करतात. पण भारतातले तरुण याच वयात उत्सव, जयंती साजरे करत बसतात. याचा विचार तरुणांनीच करायला हवा,  असेही परखड मत एंगडे यांनी मांडलं आहे.


सण-उत्सवांना आता मूळ धार्मिक स्वरुप राहिले नाही 


"आपल्याकडे सध्या सर्वच महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करताना विधायक कामांचा विसर पडला आहे असे दिसून येत आहे. हे काही समाज हिताचे नाही. लोकमान्य टिळकांनी पुरोगामी विचाराने, समाज सुधारणेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. पण, त्याचे मूळ स्वरुप, हेतू आता हरवला आहे. सण-उत्सवांना आता मूळ धार्मिक स्वरुप राहिले नाही. त्यात राजकारण शिरले आहे. सण-उत्सवांना जाणीवपूर्वक राजकीय स्वरुप दिले गेले आहे," असेही एंगडे यांनी सांगितले.