मुंबई: कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला आणि त्यापाठोपाठ आता झिका व्हायरसची राज्यात एन्ट्री झाली. झिका व्हायरसचा पहिला रूग्ण पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आढळला आहे. आधीच राज्यावर कोरोनाच्या तिस-या लाटेचं संकट आहे. त्यात झिकाची एन्ट्री झाल्यानं चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकेत मिळत असतानाच राज्यात आता एक नवं संकट येऊ पाहतंय. झिका व्हायरसचं हे संकट आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रूग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. 


बेलसरमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत बेलसरमधील काही रूग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात झिका व्हायरसचा एक रूग्ण आढळून आला आहे.


काय आहे झिका आजार?


झिका हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. या आजारात 80% रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे ही लक्षणं आढळलात. झिका आजार संसर्गजन्य नाही. 


झिका व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजून कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे डासांपासून बचाव करणं हाच एकमेव उपाय आहे.  झिकावर औषध नसलं तरी डासांची उत्पत्ती रोखणं आपल्या हाती आहे. त्यामुळ सतर्क राहा आणि स्वत:चं आणि कुटुंबाचं रक्षण करा.


झिकापासून बचाव करायचा असेल तर 


-आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी
-पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून ठेवावं
 -घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी
-घराच्या भोवती, छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका.