Zika Virus Outbreak : वारकऱ्यांनो सावधान, पंढरपुरात झिका व्हायरस, पाहा लक्षणं काय?
Pandharpur News : हिवताप विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात, पंढरपूर शहरातील मठ-धर्मशाळांना अलर्ट जारी करण्यात आलाय.
Zika Virus Outbreak In Pandharpur : वारकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, ऐन कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) तोंडावर पंढरपुरात जीवघेण्या झिका व्हायरसनं शिरकाव केलाय. पंढरपुरात शहरात झिका व्हायरसचा (Zika Virus Outbreak) रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाची धावपळ सुरु झालीय. 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच बाहेरगावहून पंढरपूर शहरातील (Pandharpur News) एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झालीय. त्यामुळे हिवताप विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात, पंढरपूर शहरातील मठ-धर्मशाळांना अलर्ट जारी करण्यात आलाय.
डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणे आहेत. विषाणूची लक्षणं दिसायला 3-4 दिवस लागतात. ताप, डोकेदुखी, शरिरावर लाल चट्टे दिसतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत, त्यामुळे कोण रोगी आणि कोण निरोगी याचा पत्ता देखील लागत नाही. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावेत. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मोफत आहेत. तसेच झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.
झिकापासून बचाव कसा कराल?
आठवड्यातून किमान एकदा पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून ठेवावं. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. तसेच घराभोवती, छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्यानं आरोग्य विभाग देखील खडबडून जागा झालाय.
दरम्यान, पंढरपुरात झिका आजाराविषयी जनजागृती केली जातेय. बाधित परिसरात हिवताप विभागानं कंटेनर सर्व्हे केलाय, काही जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतलेत. परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केलीय. वारक-यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यता आलंय. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आता प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी सुरू केली. कंटेनर सर्व्हे केला असून चार जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.