पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता हिने काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांच्या कन्येच्या प्रवेशामुळे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. गुरुवारी सकाळी अंकिता पाटील हिने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी धावपळ करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीनेही पाठींबा जाहीर केला आहे. 



अंकिता हिने आपले शिक्षण परदेशातून पूर्ण केले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी शैक्षणिक कार्य त्यांनी सुरू केले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या त्या सदस्या आहेत.