पवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...
शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.
जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.
पुण्यातल्या बारामती तालुक्यातमधल्या झारगड वाडीतल्या जाधव वस्तीची... ही पन्नास विद्यार्थी पट असलेली प्राथमिक शाळा... चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या शाळेला सध्या तळयाचं रूप आलंय.
वर्गखोल्या तसंच अंगणात साचलेल्या पाण्यामुळे शिक्षकांना शिकवणं कठिण होऊन बसलंय. तर शाळेच्या बांधकामाला तडे जाऊन त्या सिमेंटचे टपरे अंगावर पडताहेत, तसंच संरक्षक भिंतही कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत धरून इथे वावरत आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून शेजारच्या घराच्या अंगणात मुलांना शिकवण्याचं काम शिक्षक करत आहेत.
संबंधित विभागांकडे वारंवार अर्जविनंत्या करुनही काहीच फायदा झाला नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. शरद पवारांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक शाळेच्या समस्येवर आता तरी उपाय योजले जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय.