नाकाबंदी, वाहन तपासणी आणि पोलीसाचे पाय दाबणारा तरुण! कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News: हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune News: कल्याणीनगर परिसरात काल रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकारी एका युवकाकडून पाय दाबून घेत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी 24 तास या व्हिडीओला दुजोरा देत नाही.
सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांनी वाहन चालकास आडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. एका पोलीस अधिकाऱ्याने युवकास चक्क पाय दाबण्यास सांगितले, अशी प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. संबंधित तरुणाकडून यावर काही स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.
वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण
1 जून रोजी कल्याणी नगर परिसरा नाकाबंदी, वाहन तपासणी सुरु होती. यावेळी एक तरुण पोलीस अधिकाऱ्याचे पाय दाबतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान वाहतूक पोलिसांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. पीएसआय गोराडे हे या व्हिडीओत दिसत आहेत. ते 57 वर्षांचे आहेत. दरम्यान कल्याणी नगरच्या अॅडलॅब्स चौकात ड्रींक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई ते करत होते. त्यांना 2 दिवस आणि रात्र अशी सलग ड्युटी होती. त्यात त्यांची शुगर 500 पर्यंत वाढली होती. यामुळे त्यांच्या पायात क्रॅम्प आला. त्यांच्या पायातील क्रॅम्प काढण्यासाठी संबंधित व्यक्ती पाय दाबत असल्याचे व्हिडीओत दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.